| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र टक्केवारीची समस्या निर्माण झाली आहे. खोटी बिले काढून पैशांची लूट केली जात आहे. त्याविरोधात ही लढाई आहे. खोटी कामे घेऊन बिले काढली जात आहेत. हे थांबविण्यासाठी ही लढाई आहे. महाविकास आघाडीमार्फत ही निवडणूक लढवित आहोत. प्रचाराच्या दरम्यान शेकापसह महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषेदवर शेकाप-महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्यावर खोटी बिले काढणाऱ्यांविरोधात चौकशीचा ससेमिरा लावला जाईल, अशा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून गावा-गावात प्रचार सुरु आहे. महाविकास आघाडीमार्फत ही निवडणूक लढविली जात आहे. मतदारांकडून चांगली साथ मिळत आहे, त्याचा आनंद आहे. तालुक्यात सर्व जागा जिंकणार, असा विश्वास आहे. या निवडणुकीत 1978 प्रमाणे विजय मिळवायचा आहे. त्या पद्धतीने मताधिक्याने जागा जिंकून आघाडीला यश मिळेल. सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या कामाचे वीस टक्के घेतले जात आहेत. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. त्याविरोधात काम करायचे आहे. या तालुक्यामध्ये शेकाप, काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महाविकास आघाडीचे यश असणार आहे. हिंदुत्वाच्या नावाने मते मिळविण्याचा प्रयत्न भाजपवाले करीत आहेत. हिंदुत्व सांभाळण्याची मक्तेदारी फक्त त्यांनीच घेतली आहे, असा दिखावा करतात. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासण्याचे काम ही मंडळी करीत आहे. हे कदापि खपवून घेतले जाणार नाही. त्याविरोधात ही लढाई आहे. पुढील काळात आक्रमक होऊन काम करावे लागणार आहे. या निवडणुकीत थळसह चेंढरे आदी सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. त्या पद्धतीने आघाडीने निश्चय केला आहे. या मतदार संघात राजाभाऊ ठाकूर मताधिक्क्यांनी निवडून येतील, असा विश्वास आहे, असे जयंत पाटील म्हणाले.






