थरमॅक्सच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
| रसायनी | प्रतिनिधी |
कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केलेल्या 16 कामगारांना थरमॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने अखेर गुरुवार, दि.29 मे रोजी कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. यावर एक कामगारांनी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे या कामगारांचा प्रश्न काही काळापुरता तरी सुटला आहे.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील पौद येथील थरमॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने 16 कामगारांना एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केले होते. यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. दोन महिने पगार नसल्याने कंपनी प्रशासनाला या कामगारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने सदर कामगारांना अटी-शर्तीवर कामावर घेण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, सरपंच दिपाली पाटील, पोलिस निरीक्षक अनिल पवार, कंपनी कन्सल्टंट सुनील कदम, व्यवस्थापक दिलीप कदम, एचआर हेड विजय सियाक, शशी साळुंखे, संतोष बैलमारे यांच्यात चर्चा झाली. यावेळी 16 कामगार जुन्या युनियनचा राजीनामा देऊन भारतीय कामगार कर्मचारी संघाचे नेतृत्व स्वीकारतील, कर्मचारी व युनियन यांनी कंपनीवर केलेल्या तक्रारी मागे घेण्यास याव्यात, कंपनी व्यवस्थापन युनियन पदाधिकारी भाई जगताप यांनी लवकरात लवकर मार्ग काढून 16 कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे, अशी कामगारांनी विनंती केली आहे.