। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे शहरातील कोपरी पुलाजवळ एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 29) घडली असून या अपघाताची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तसलीम मोहम्मद अन्सारी (43) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव असून ते ठाण्यातील नितीन कंपनी भागात राहत होते. अन्सारी हे मंगळवारी कामानिमित्त दुचाकीने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. त्याची दुचाकी कोपरी पुलाजवळ येताच नाशिक-मुंबुई महामार्गावर गुजरातहून कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या ट्रकची धडक अन्सारी यांच्या दुचाकीला बसली. या अपघातात अन्सारी गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, नौपाडा पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातामुळे सुमारे अर्धा तास या वाहिनीवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला असल्याचे ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.