वर्धापनदिनाला सात हजार भाकरी-भाजी, ठेचा नेण्याचा निर्धार; बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी
| पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन 2 ऑगस्ट 2026 रोजी खालापूर येथे उत्साहात साजरा होणार असून, या सोहळ्यासाठी पनवेलमधून तब्बल चार हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली. तसेच पनवेलमधून कार्यकर्त्यांसाठी सुमारे सात हजार भाकरी, भाजी आणि ठेचा नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी पनवेल येथे झालेल्या शेकापच्या 78व्या वर्धापन दिनाच्या धर्तीवर यंदाही पनवेलमधील कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण घरत, नूतन सभापती देवेंद्र गंगाराम मढवी, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, चिटणीस नगरसेवक प्रकाश म्हात्रे, पनवेल तालुका शेकापचे चिटणीस राजेश केणी, कार्यालयीन चिटणीस विलास फडके आदी पदाधिकारी तयारीला लागले आहेत.
30 जुलै रोजी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये बैठका घेण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 1 मध्ये राईस मिल भालचंद्र पाटील यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक 2 मध्ये विजय पाटील यांच्या कार्यालयात, प्रभाग क्रमांक 3 मध्ये रौफ शेख आणि अनंता पाटील यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक 4 व 6 साठी जगदीश नावडेकर यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रतीक ढोबळे यांच्या निवासस्थानी, प्रभाग क्रमांक 14, 15 व 16 साठी केतन भगत यांच्या कार्यालयात, तर प्रभाग क्रमांक 17 ते 20 साठी पनवेल मध्यवर्ती कार्यालयात बैठका पार पडल्या.
पनवेलच्या ग्रामीण भागातही वावंजे पंचायत समिती गणात डी.बी. म्हात्रे यांच्या निवासस्थानी, चिंद्रण गणात मोहन गोपी खानाव यांच्या निवासस्थानी, नेरे गणात चांगाशेठ उसाटकर-दुंदरे, आदई गणात शंकरबुवा फडके, विचुंबे गणात पुरुषोत्तम भोईर यांच्या निवासस्थानी, कोन गणात धर्मा पाटील हॉल, पलस्पे गणात मोहन गवंडी यांच्या निवासस्थानी बैठका घेण्यात आल्या. तसेच वडघर जिल्हा परिषद गणासाठी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश नाईक यांच्या वतीने विठ्ठल-रुक्माई मंदिर, कोल्ही येथे, तर गव्हाण जिल्हा परिषद गणासाठी समीर पाटील यांच्या कार्यालयात बैठक घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
खालापूर येथे होणाऱ्या वर्धापन दिनासाठी अनेक कार्यकर्ते स्वतःच्या वाहनांवर शेकापचे झेंडे आणि बॅनर लावून सहभागी होणार आहेत. त्यामुळे पनवेलपासून खालापूरपर्यंत शेकापच्या झेंड्यांनी परिसर दुमदुमणार असून, वर्धापन दिनाच्या सोहळ्याला पनवेलची दमदार उपस्थिती राहणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
