स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या महास्वच्छता अभियानात श्रीसदस्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होत आजूबाजूचा परिसर, रस्ते चकाचक केले. यावेळी गोळा करण्यात आलेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

रेवदंड्यात महास्वच्छता अभियान

| रेवदंडा । वार्ताहर ।
या महास्वच्छता अभियानात मोठया संख्येने श्रीसदस्य व रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. रेवदंडा मोठे बंदर ते रेवंदडा पानसेवाडी पर्यंतचा मुख्य रस्ता तसेच, समुद्र किनार्‍यावर जाणारा रस्तावर श्री सदस्यांनी श्रमदानाने स्वच्छता केली. रेवदंडयातील मुख्य रस्ता दोन्ही बाजूने केरकचरा, वाढलेली झाडी झुडपे काढून चकाचक करण्यात आला.

तसेच रेवदंडा समुद्र किनारी जाणारे मार्गावर साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानात जमा झालेला केरकचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. या महास्वच्छता अभियाना श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच रेवदंडा ग्रा.पं. सरपंच मनिषा चुनेकर, संदिप खोत, संतोष मोरे, निलेश खोत आदीनी श्रमदान केले.

सरकारी कार्यालये चकाचक

| पोलादपूर | प्रतिनिधी |
महास्वच्छता अभियानाची सुरुवात श्रीसमर्थ बैठक हॉल परिसरातून करण्यात आली. या महास्वच्छता अभियानामध्ये पोलादपूर शहरातील सरकारी रुग्णालय, एसटी बस स्थानक परिसर, पंचायत समिती कार्यालय पोलीस स्टेशन, नगरपंचायत परिसर, बांधकाम विभाग कार्यालय तसेच विविध अंतर्गत रस्ते इत्यादी ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर महास्वच्छता अभियानात 210 श्री सदस्यांसह अन्य 17 नागरिकांनी सहभाग घेतला. या अभियानामध्ये एकूण 7.5 टन सुका कचरा तर 150 किलो ओला कचरा संकलित करण्यात आला.


या महास्वच्छता अभियानाचा समारोप समारंभ पोलादपूर तहसील कार्यालय परिसरात करण्यात आला. यावेळी शैलेश पालकर यांनी धर्माधिकारी परिवाराकडून होणार्‍या सामाजिक कार्याबद्दल प्रशंसा केली. याप्रसंगी पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई, गटविकास अधिकारी भास्कर जगताप, सोनाली गायकवाड आदींनी श्रीसदस्यांसमोर त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

खोपोली शहरात स्वच्छता मोहीम

| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जवळपास 39 टन कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत हजारो श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता. जवळपास 39 टन कचरा यावेळी गोळा करण्यात आला.

वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसाठी खोपोली नगरपरिषद प्रशासनाचेदेखील सहकार्य लाभले. स्वच्छता मोहिमेनंतर परिसराचा कायापालट झालेला पाहावयास मिळाला.

श्रमदानातून गावांची स्वच्छता

| माणगांव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील नगरपंचायत माणगांव, ग्रामपंचायत गोरेगाव, ग्रामपंचायत निजामपूर तसेच तळा तालुक्यातील नगरपंचायत तळा हद्दीत बुधवार (दि.1) श्री सदस्यांनी ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवून श्रमदान करून स्वच्छता केली. त्यामध्ये माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये 1442 श्रीसदस्यांनी एकत्रित येत 61 टन ओला व सुका कचरा, गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये 950 श्रीसदस्यांनी एकत्रित येत 37 टन ओला व सुका कचरा, निजामपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये 325 श्रीसदस्यांनी एकत्रित येत 24 टन सुका कचरा, तळा नगरपंचायत हद्दीमध्ये 202 श्रीसदस्यांनी एकत्रित येत 19 टन ओला व सुका कचरा उचलला. 2919 श्रीसदस्यांनी श्रमदान करून एकूण 141 टन इतका ओला व सुका कचरा उचलून चारही गावांची स्वच्छता केली.


श्रीसदस्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. श्री सदस्यांनी राबविलेल्या वरील चारही गावांतील या स्वच्छता अभियान कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यालयाचे सफाई कामगार आदी सहभागी झाले होते.

हजारो टन कचरा संकलित

| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत, नेरळ शहर येथे महाग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये कर्जत शहरात 121 टन सुका कचरा तर नेरळ व नेरळ ग्रामीण भागातून सहा टन 950 किलो सुका तर चार टन 810 किलो ओला कचरा संकलित केला. अभियानामध्ये कर्जत परिसरातील 16 बैठकीतील सुमारे नऊशे सदस्य तसेच नेरळ भागातील नेरळ टेपआळी, नेरळ पायरमाळ, कोलीवली, धामोते, वारे, तळवडे, पोशिर, पाटगाव या बैठकीतील श्री सदस्यांनी सहभाग घेतला होता.

Exit mobile version