| रेवदंडा | प्रतिनिधी |
बोर्ली नाका येथील मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची सतत गळती सुरू असून, दररोज हजारो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. विशेष म्हणजे परिसरात उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असताना, संबंधित यंत्रणेकडून या गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त
होत आहे.
बोर्ली नाक्याजवळील मुख्य रस्त्याचे सुमारे दोन वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करून नूतनीकरण करण्यात आले. मात्र, काँक्रिटच्या रस्त्याच्या मध्यभागातून सातत्याने पाणी वाहत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. हे पाणी नेमके कोणत्या जलवाहिनीतून अथवा पाईपमधून गळत आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. फणसाड धरणाच्या मुख्य जलवाहिनीत बिघाड झाला आहे की, एखाद्या घरगुती नळजोडणीतून पाणी गळत आहे, याची तपासणी होणे गरजेचे आहे. सतत वाहणाऱ्या या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल व पाणी साचत असून, परिसरातील दुकानदार तसेच वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या काँक्रिटमध्येही पाण्यामुळे झीज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बोर्ली परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या फणसाड धरणाची पाणीपातळी उन्हाळ्यात कमी झाल्यानंतर पंचक्रोशीत दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. अशा परिस्थितीत मुख्य रस्त्यावर महिनोन्महिने हजारो लिटर पाणी वाया जाणे ही गंभीर बाब आहे. स्थानिक ग्रामस्थ, समाजसेवक तसेच ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याची गळती शोधून ती कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी होत आहे.






