नवी मुंबईतील हजारो झोपडीवासीय मंत्रालयावर धडकणार

घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली निघणार मोर्चा
| नवी मुंबई | वार्ताहर ।
मुंबई मेट्रोपोलिटन रिजन अर्थात मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो झोपडीवासीयांना घराचा अधिकार मिळावा यासाठी घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली हजारो झोपडीवासीयांचा मोर्चा येत्या २७ एप्रिल रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या बॅनरखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी घरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना आणि पुरोगामी पक्ष एकवटले आहेत. नवी मुंबईतील हजारो झोपदीवासीय या मोर्चात सामील होणार असल्याची माहिती घर हक्क संघर्ष समानव्य समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरामण पगार,खाजमिया पटेल आणि रवि भिलाणे यांनी दिली.
राज्य सरकारने २०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याची घोषणा करून एक तप उलटले तरी सरकार कडे कोणताही अद्ययावत सर्व्हे नाही. मात्र वाट्टेल तेव्हा मनमानी पद्धतीने तोडक कारवाई करून सरसकट सर्वच झोपडीधारकाना बेघर केलं जातं.झोपडीवासीयांना वीज, पाणी, शौचालये आदी मानवी सुख सोयींपासून वंचित ठेवलं जातं.सरकारने झोपडी वासीयांसाठी घोषित केलेल्या कोणत्याही योजना पूर्ण केल्या जात नाहीत. मात्र सर्व नियम कायदे कानून बासनात गुंडाळून वाट्टेल तेव्हा त्यांना बेघर केलं जातं आणि पुनर्वसनही नीट केलं जातं नाही. झोपडी धारकांकडील पुरावे ग्राह्य धरले जात नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने आता एकदाचा काय तो सर्व्हे पूर्ण करावा आणि तीच अंतिम कट ऑफ डेट जाहीर करावी या आणि इतर अनेक मूलभूत मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याची माहिती घर हक्क संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक हिरामण पगार तसेच खाजामिया पटेल, सुमित वांजळे, सीताराम शेलार, शुभम कोठारी, रत्ना माने, जमीला बेगम एकतुल्लाह, विनिता बाळेकुंद्री यांनी दिली आहे.
या मोर्चात मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील हजारो झोपदीधारक सामील होणार असून मुंबई महानगर क्षेत्रातील विविध पुरोगामी पक्ष, संस्था – संघटना यांनीही यात सामील व्हावं असं आवाहन घर हक्क संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रवि भिलाणे, संजय शिंदे, नामदेव पोपट गुलदागड, हैदर इमाम यांनी केले आहे.

Exit mobile version