जिल्ह्यातील हजारो आदिवासी करणार महामहीम राज्यपालांचे ढोल – मांजऱ्यांच्या गजरात स्वागत

अनुसूचित क्षेत्रातील विविध समस्यांचे निवेदनही देणार

गडचिरोली | प्रतिनिधी |

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ११ व १२ आक्टोंबर ला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून महामहीम राज्यपालांचे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी जनता आणि ग्रामसभांच्या वतीने पारंपरिक वेशभूषेत रेला, ढोल – मांजऱ्यांच्या गजरात स्वागत करण्यात येणार असून त्यासाठी हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातील आदिवासी जनता उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महामहीम राज्यपाल हे आदिवासी जनतेचे घटनात्मक पालक असल्यानेच जिल्हा प्रशासनाने त्यांच्या भेटीची वेळ व त्यासंबंधातील पासेस उपलब्ध करून द्यावेत यासाठी आज आदिवासी आणि ग्रामसभांचे नेते जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेकडे पत्र घेऊन गेले होते.

मात्र त्यांची भेट न झाल्याने तसेच इतर अधिकाऱ्यांनी वेळ व पासेस देण्यास असमर्थता दर्शवल्याने गडचिरोली येथील गांधी चौकात सुरक्षित अंतर राखून महामहीम राज्यपाल यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेला, ढोल- मांजऱ्या आणि पारंपरिक वेशभूषेसह स्वागत करण्यात येईल व देशातील अतिअसुरक्षीत माडीया व आदिवासी जनता तसेच ग्रामसभा यांच्याशी संबंधित समस्या तसेच पेसा, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणी, जिल्ह्यातील बळजबरी प्रस्तावित आणि सुरु करीत असलेल्या लोह खदानी रद्द करुन आदिवासींच्या प्रथा, परंपरा, संस्कृती, रितीरिवाज आणि जगण्याची संसाधने यांचे रक्षण आणि जतनासाठी यासह विविध पायाभूत विकासाच्या संबंधाने निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version