आ.जयंत पाटील यांची मागणी
| नागपूर | प्रतिनिधी |
गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली येथील सुरजागड़ स्टील प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र या प्रकल्पात स्थानिक आदिवासी समाजाला रोजगार मिळाला पाहिजे,अशी मागणी शेकाप आम. जयंत पाटिल यांनी विधान परिषदेत केली . पाटील पुढे म्हणाले की, एटापल्ली येथे मी गेलो होता. मुंबई ते गोवा इतके क्षेत्र हे गड़चिरोली जिल्ह्याचे आहे . स्थानिक तरुणांना मच्छीमारी व्यवसाय करण्यासाठी सोसायट्याना परवानगी दिली पाहिजे. तेथील नदीत मिळणारा झिंगा आणि इतर मच्छी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाऊ शकते,असेही त्यांनी सांगितले.
तेथे शेकापचे कार्यकर्ते, पदाधिकारी आदिवासी समाजासाठी काम करत आहेत. . सुरजागड़ येथील प्रकल्पात बिहार ,उत्तर प्रदेश मधून आलेले कामगार काम करत असल्यामुळे स्थानिक आदिवासी समाजाच्या तरुणांना,महिलांना रोजगार मिळत नाही त्यामुळे त्या ठिकाणी आदिवासी समाजात असंतोष असल्याचेही जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मी गडचिरोली जिल्ह्याचा पालक मंत्री होतो.तिथे नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी तिथे प्रकल्प येत नाहीत.मात्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिल्यानंतर मी तिथे जाऊन पोलीस व प्रशासन यांना विश्वासात घेऊन या फोफावलेल्या नक्षलवादाचा बीमोड करण्यास सांगितले. त्यावेळी सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या नक्षल वाद्यांना यमसदनी पाठवले असल्याचे सुचित केले. मलाही नक्षलवाद्यांच्या धमक्या मिळाल्या मात्र त्याला न जुमानता मी राज्याच्या विकासाला प्राधान्य दिल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
सुरजागड़ स्टील प्रकल्पाची माहिती देताना ते म्हणाले की, या प्रकल्पाची सुरुवात 1993 साली झाली आहे. लॉईड मेसर्स इंजीनियरिग कंपनीने पर्यावरण, वन विभागाची परवानगी घेऊन गौण खनिज उत्खननाचे काम सुरु केले आहे. यात 3525 आदिवासी तरुणांना रोजगार मिळाला आहे .तर यातून राज्य सरकारला 342 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामध्ये कौशल्य कामगार सोडून स्थानिक आदिवासी तरुण आणि महिलांना प्रशिक्षण दिले जाते .तसेच कोनसरीला स्टील प्लांटसाठी 20 हजार कोटींची गुंतवणुक करीत आहेत सिक्युरिटी अकादमी सुरु करणार आहे.या प्रकल्पामुळे हजारो कोटींचा राज्य सरकारला महसूल मिळणार आह.या संदर्भात आमदारांची एक बैठक लावून त्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे ही मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले.