मुंबई महापौरांच्या कार्यालयासह अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

ईमेलमुळे खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

। मुंबई । प्रतिनिधी ।

‘मुंबई बोलणार खलिस्तान जिंदाबाद. तुमच्या मुलांना वाचवा’, असे म्हणत एका संघटनेकडून मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबईतील काही शाळांमध्ये स्फोट घडवणार असल्याचेही मेलमध्ये म्हटले आहे. खलिस्तान नॅशनल आर्मी नावाच्या संघटनेकडून ही धमकी देण्यात आली आहे. मेलमध्ये काही नावेही आहेत. इंजिनिअर गुरनाक सिंग, रुकन सहवाला, डॉ. गुरनीवैर सिंग, खान राजदा, बब्बर खालसा (कॅनडा), प्राध्यापक गुरकाल सिंग, खेम करण, प्राध्यापक, गुरनगर सिंग, जादियाला गुरु अशी नावे या संघटनेच्या नावाखाली दिलेली आहे.

ग्रेनेडने महापौरांचे कार्यालय उडवण्याची धमकी
ईमेलमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचे कार्यालय उडणार असल्याचे म्हटले आहे. 3.11 वाजता स्फोट घडवण्याचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर मुंबई आणि नवी मुंबईतील काही शाळांमध्येही 1.11 वाजता स्फोट घडवण्याची धमकी दिली गेली आहे. या मेलनंतर मुंबई आणि नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. पोलिसांकडून महापौर बंगला, संबंधित शाळांमध्ये बॉम्ब शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
खारघरमधील विभग्योर शाळेत बॉम्बची अफवा
खारघर विभग्योर शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल शाळा प्रशासनाला आल्याने एकच खळबळ उडाली. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांना फोन करून मुलांना घरी परत नेण्यास सांगितले. अचानक आलेल्या शाळेच्या कॉलमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. खारघर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकाने देखील शाळेच्या आवारात तपासणी सुरु केली आहे.
Exit mobile version