उत्खनन आणि बेकायदा बांधकामांवर प्रश्नचिन्ह
| महाड | उदय सावंत |
ऐतिहासिक किल्ले रायगड आणि परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे जैवविविधता, नैसर्गिक संपत्ती आणि ऐतिहासिक वास्तूंना गंभीर धोका निर्माण झाला आहे. रायगड प्राधिकरण मार्फत विविध विकास प्रकल्प राबवले जात असताना, खासगी जमिनींच्या खरेदी-विक्रीनंतर मोठ्या प्रमाणात सपाटीकरण व उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. या उत्खननामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला असून, हे काम नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी, पाचाड आणि आसपासच्या भागात पूर्वी भारतीय पुरातत्व विभाग कडून खोदकाम व बांधकामांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, सध्या या नियमांकडे दुर्लक्ष करून मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि बांधकाम सुरू असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पाचाड परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना स्थानिक महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. काही प्रभावशाली व नव्याने निवडून आलेल्या नेत्यांकडून कोणतीही परवानगी न घेता बांधकामांचा सपाटा लावण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
यासंदर्भात स्थानिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी संबंधित अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या विषयाचा मी आढावा घेत असून, त्यानंतर अधिकचा तपशील देण्यात येईल.
महेश शितोळे,
तहसीलदार, महाड






