पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली
। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हल्ल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. शनिवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवला होता. त्यानंतर अहमदाबाद पोलिसांनी स्टेडिअमची सुरक्षा वाढवली आहे. भारत पाकिस्तान सामन्याआधी स्टेडिअम उडवून देऊ अशी धमकी देणारा मेल आला होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधानांना इजा करण्याची आणि अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी दिली होती. पाठवणाऱ्याने 500 कोटी रुपये आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची तुरुंगातून सुटका करण्याची मागणीही त्या मेलद्वारे केली होती.
अतिरिक्त पोलीस आयुक्त चिराग कोराडिया यांनी याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. शनिवारी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने असतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. एका अज्ञात व्यक्तीने पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी स्टेडिअम उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीला घाबरण्याची गरज नाही.