किरवली गावातील घरांना धोका

सुरुंग स्फोटामुळे घरांना भेगा

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या बाजूने पनवेल कर्जत रेल्वे मार्ग जात आहे. किरवली गावाच्या मागे पनवेल-कर्जत मार्गाचा तीन किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात येत आहे. दरम्यान, या बोगद्याच्या खोदकामात गेली सहा महिन्यापासून दररोज सुरुंग स्फोट केले जात आहेत, त्यामुळे किरवली गावातील घरांना तडे जाण्याच्या घटना दररोज घडत आहेत. डोंगरातील दगड फोडून बोगद्याच्या काम सुरू असून त्यासाठी ब्लास्टिंग केले जात आहे. मोठ्या प्रमाणात सुरुंग स्फोट करून दगड फोडले जात असून त्यामुळे येथील घरांना तडे गेलेले असून घरांचे नुकसान होत आहेत. सुरुंग स्फोटामुळे तडे गेलेल्या घरांच्या मालकांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

मात्र रेल्वे किंवा शासन याबाबत स्थानिकांच्या मागणीचा विचार करीत नाहीत, त्यामुळे येथील मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांनी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष अंकुश सुरवसे यांनी कर्जत तहसील कार्यालयाला नोटीस दिली आहे. नुकतीच इरशालवाडी येथे दरड भूस्खलन होवून मोठी दुर्घटना घडली आहे त्यामुळे कर्जत तहसिल कार्यालयाने पहाणी करून घरांना गेलेल्या तडांचे व पुढील मोठी दुर्घटना होण्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे आणि म्हणून वेळीच पावले उचलावीत असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. यावेळी प्रसंगी मैत्रेय बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुश सुरवसे, सचिव शशिकांत उबाळे, गोरख सुरवसे, श्रेयस वाघमारे, विशाल सत्यवर्धन, निखिल ढोणे आदी स्थानिक उपस्थित होते.

Exit mobile version