खाद्यपदार्थ विक्रेते करतात गॅसचा रस्त्यावर वापर
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नविन पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी अनेक दुकाने थाटली असून भर रस्त्यावर एलपीजी सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ बनवले जात आहेत. घरगुती गॅसचा देखील वापर केला जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत असून त्याविषयी वारंवार अनेक वर्तमान पत्रात बातम्या येऊन सुध्दा महापालिका प्रशासन व शासकीय विभागांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
नविन पनवेल रेल्वे स्थानकाचा परिसर गजबजलेला असून त्याठिकाणी हजारोच्या संख्येने कामगार वर्ग प्रवास करत असतो. रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये रस्त्यावर एलपीजी सिलेंडरचा राजरोसपणे वापर केला जातो. हे एलपीजी सिलेंडर उघड्यावर ठेवले जात असून लगतच्या भागातून सिकेटी शाळा व बांठीया शाळेतील विद्यार्थी तसेच चाकरमान्यांच्या गर्दीचा वावर असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका पहोचण्याची शक्यता आहे.
यापूर्वी उघड्यावर असलेल्या सिलेंडर स्फोटात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. असे असताना अशा चुकीच्या पद्धतीने उघड्यावर गॅसचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलीस तसेच संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या रोजबाजारात सायंकाळी दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रोजबाजारमधील टपऱ्यामध्ये बेकायदेशीर हाॕटेल सुरु केले असून या टपरीधारकांनी येथिल फूटपाथवर ही खाद्य पदार्थ विक्रीसाठी स्टाॕल लावून ते फूटपाथवर भाड्याने दिले आहेत. यांच्याकडून 9 ते 10 हजार रुपये भाडे येथील टपरीवाले घेत आहेत. या टपऱ्यावर येथिल राजकारण्याचा हात असल्याचे येथिल जेष्ठ नागरिक सांगत आहेत. नविन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या विक्रेते व त्यांच्या गाड्या असताना महापालिका, अन्न, औषध प्रशासन किंवा इतर विभागांकडून यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.