प्रशासनाकडून कंपाऊंड काढण्याचा दिखावा; यामागे अर्थकारण झाल्याचा संशय
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानच्या मंकी पॉईंट, मालडुंगा पॉईंट भागातील 36 एकर जमिनीवर वसलेल्या एल्फिन्स्टन बंगला परिसरात तेथील जमीन मालकाकडून तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातून सैर करणाऱ्या वन्यजीवांच्या मुक्त संचारावर मर्यादा आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत नगरपरिषद व वन विभागाला वेळोवेळी लेखी निवेदन देत या प्रकरणात तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली होती. याबाबतचे वृत्त ‘कृषीवल’ने दि.4 मार्च रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर 15 दिवसांत महसूल अधीक्षकांच्या आदेशाने वन विभागाकडून येथील कुंपण हटविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने येथील जाळ्या काढण्याचा दिखावा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील जंगली प्राणांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा आली असून त्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे.
माथेरान हे ठिकाण डोंगरावर वसलेले असून, येथील मोठ्या प्रमाणातील भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. येथील वनसंपदा ही वन्य प्राण्यांचा आदिवास समजला जातो. तसेच, माथेरानमधील वन नियम आणि कायदे हे राज्याच्या अन्य भागांपेक्षा वेगळे आहेत. परंतु, मागील काही वर्षांपासून या ठिकाणी सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याची परंपराच सुरू झाली आहे. येथील वन्य प्राण्यांना जंगलात मुक्त संचार करता यावा यासाठी माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे कुंपण घातले जाऊ नये, असे मुंबई वन कायद्यात नियम आहे. परंतु, सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. परिणामी आगामी काळात या वन्य प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता स्थानिकांसह निसर्ग प्रेमींकडून वर्तवली जात आहे.
दरम्यान, येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास 36 एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड केले आहे. हे केलेले कंपाउंड योग्य नसून वन्य प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे. या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. त्यामुळे हे कंपाऊंड तातडीने काढून टाकण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी संबंधित विभागाकडे लेखी पत्रव्यवहार केलेला असतानाही अद्याप याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नगरपरिषद व संबंधित प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी मार्च महिन्यात या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे, असा दिखावा केला होता. वनपाल यांनीही याठिकाणची एक दिवस नाममात्र पाहणी केली होती. परंतु, काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचदरम्यान महसूल अधीक्षकांच्या आदेशाने वन विभागाकडून या कंपाऊंडच्या चार ते पाच जाळ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु, पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
मुक्त संचारावर कुंपणाची गदा
एल्फिन्स्टन बंगला परिसरात घातलेल्या कंपाऊंडमुळे वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारात अडथळा निर्माण झाला आहे. या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी वन्य प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु, त्यांच्या मार्गात एल्फिन्स्टन बंगल्याच्या सभोवताली असलेले तारेचे कंपाऊंड मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राणी मार्गाअभावी त्याच ठिकाणी खुपवेळ रेंगाळत राहतात. त्याचा त्रास परिसरातील स्थानिकांनाही सोसावा लागत आहे. असेच सुरू राहिले तर येथील वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात येऊ शकतो. किंवा ते अन्यठिकाणी स्थलांतरीत होण्याची भीती प्राणी मित्रांकडून व्यक्त केली जात आहे.
माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही. आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे. बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुद्धा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
संतोष शिंदे,
उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान
