सनियंत्रण समितीकडून जागांची पाहणी
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग हा साहसी खेळातील प्रकार विनापरवानगी सर्रास सुरू होता. या व्हॅली क्रॉसिंगमुळे येथील पर्यटनही वाढले होते. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता. एको पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, मायरा पॉईंट, अलेक्झेंडर पॉईंट अशा अनेक ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग सुरू होत्या. पण, त्या वन विभागाच्या हद्दीत असल्याने वन विभागाने त्या काढून टाकल्या. पण परवानगी घेऊन त्या सुरू होण्याची आशा आहे. येथील सनियंत्रण समितीच्या दोन सदस्यांनी जागेवर जाऊन भरपावसात पाहणी केल्यामुळे स्थानिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
माथेरान मधील पॉइंटवर पुन्हा व्हॅली क्रॉसिंग सुरू व्हावी, अशी मागणी जोर धरत होती. याबाबत नगरपालिकेत माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कारकीर्दीत ठरावही झाला होता. यासंबंधी एक प्रस्ताव तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यांनीही या प्रस्तावाला सकारात्मकता दाखवली होती. पण, माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने त्यांच्या परवानगी घेणे अडचणीचं होतं. त्यात सरकार बदलल्याने हा प्रकल्प कागदावरच राहिला, पण आता चक्क सनियंत्रण समितीच्या दोन सदस्यांनी पाहणी केल्यामुळे स्थानिक बेरोजगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शुक्रवारी 14 जुलै रोजी सनियंत्रण समितीचे सदस्य राकेश कुमार आणि डेव्हिड कार्डोस हे पाहणीसाठी आले होते. सायंकाळी 5.30 वाजता अलेक्झेंडर पॉइंटवर जाऊन त्यांनी अलेक्झेंडर पॉईंट ते रामबाग पॉईंट व्हॅली क्रॉसिंगच्या जागेची पाहणी केली. मात्र, याबाबत प्रसारमाध्यमांशी ते काहीही बोलले नाहीत. कर्जत तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, येथील तहसीलदार तथा अधीक्षक दिक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे तसेच महसूल विभाग आणि पालिका विभागाचे कर्मचारी त्यांच्यासमवेत होते. याबाबत कोणताही निर्णय घेतला नसला तरी सदस्यांनी केलेल्या पाहणीमुळे भविष्यात व्हॅली क्रॉसिंगचा साहसी प्रकार माथेरानमध्ये सुरू होईल, अशा मानसिकतेमध्ये येथील स्थानिक बेरोजगार आहेत.
व्हॅली क्रॉसिंग दोन वर्षे माथेरानमध्ये सुरू होती. पण त्याकाळात कोणताही अपघात झाला नाही. आम्ही याचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे पूर्ण सुरक्षेचा विचार करून त्या सुरू होत्या. पण, याच्या परवानग्या मिळत नसल्याने त्या वन विभागाने बंद केल्या. पण, ज्यांच्या हातात माथेरानची धुरा आहे, त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यामुळे व्हॅली क्रॉसिंग पुन्हा सुरू होईल अशी आशा वाटू लागली आहे.
दिलीप सकपाळ, स्थानिक बेरोजगार