कर्जतमध्ये ऐन रमजान महिन्यात घडला विचित्र प्रकार

प्राध्यापकाला जनावरांप्रमाणे कापून टाकण्याची धमकी

। नेरळ । प्रतिनिधी ।

गोहत्या बंदीबद्दल जनजागृती करणार्‍या मुस्लिम तरुणावर जीवघेणा हल्ला झाला असून रमजानसारखा पवित्र महिना सुरु असताना ही घटना कर्जत तालुक्यातील साळोख गावात घडली. प्राध्यापक असलेल्या युवकाला जामा मशिदीच्या वजूखानाजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि नंतर मशिदीबाहेर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

साळोख गावातील तरुण हा आचार्य अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्याच्या वडिलांचे साळोख गावात मच्छीचे दुकान आहे. शुक्रवारी 7 एप्रिल रोजी दुपारी पावणेचार वाजता हा तरुण घराकडे येत असताना गावातील दोन तरुण भेटले. त्यावेळी प्राध्यापक तरुणाने गोहत्या बंदी कायदा लागू आहे. तुम्ही बेकायदा जनावरांची कत्तल करीत असून त्यामुळे आपल्या गावाची बदनामी होत आहे. ती बाब लक्षात घेऊन तुम्ही हे धंदे थांबवा, अशी सूचना केली. त्यावेळी प्राध्यापक तरुण आणि साळोख गावातील दोन तरुण यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी त्या दोन्ही तरुणांनी तुला गायी कापतो, तसे कापून टाकू, अशी धमकी दिली.

रमजान महिना असल्याने रात्री नऊ ते दहा या वेळेत देखील मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी जमत असतात. त्यावेळी प्राध्यापक असलेला तरुणदेखील रात्री नऊ वाजता आपल्या गावातील जामा मशीद येथे नमाज अदा करण्यासाठी गेले. त्यावेळी मशिदीत असताना तेथील वजूखानाजवळ तुला बोलावले आहे, असे सांगितले. त्यावेळी तो वजूखानाजवळ आला. दुपारी भेटलेल्या त्या दोन तरुणांनी आम्ही करीत असलेलले धंदे बंद करायला सांगतो काय? असे बोलून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता ते तरुण मशिदीच्या बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा एकदा त्या तरुणांच्या घोळक्याने साकीर जवारी यांच्या घरासमोर प्राध्यापक तरुणाला गाठले आणि तेथील घराचे कौले तसेच लाठीकाठ्या आणि लोखंडी रॉड यांच्या साहाय्याने आठ मुस्लिम तरुणांनी प्रचंड मारहाण करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्यात त्या प्राध्यापक तरुणाच्या डोक्यातून, तोंडातून रक्तस्त्राव झाला. स्थानिक ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने आरोपींनी प्राध्यापकाला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पळ काढला.

याबाबत जखमी तरुणाच्या वडीलांनी जखमी अवस्थेतील तरुणाला घेऊन नेरळ पोलीस ठाणे गाठले. नेरळ पोलिसांनी आधी सव्वा दहा वाजता या तरुणाला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यासाठी नेले. तेथे डोक्यातील जखमा गंभीर असल्याने रुग्णवाहिकेतून पनवेल कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता दाखल केले असून तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. साळोख गावात जामा मशिदीत लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि नंतर सशस्त्र हल्ला करण्याची घटना ऐन रमजान महिन्यात घडल्याने मुस्लिम बांधवांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

Exit mobile version