| पनवेल | प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून पत्रकार विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटूंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती दुंदरेकर यांनी रविवारी (दि.21) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. तसेच, या संदर्भात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेत विजय दुंदरेकर यांनी सांगतिले की, नुकतेच त्यांच्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली होती. यावेळी उत्तरकार्य कधी करायचे याबाबत त्यांच्या कुटुंबीयांची चर्चा होत असताना त्यांच्या कुटुंबियांमध्ये वादविवाद झाले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियातील आदित्य दुंदरेकर याने शिवीगाळ करून विजय दुंदरेकर यांचा मुलगा विनय दुंदरेकर यांना मारण्यासाठी धावला आणि बाजूलाच पडलेला लाकडी दंडका उचलून त्यांच्या डोक्यात मारला. त्यात विनय दुंदरेकर गंभीर जखमी झाला. त्यावेळी सचिन पाटील व किशोर भगत हे सुद्धा आदित्यच्या मदतीला उभे राहिले होते. त्यांनी देखील विजय दुंदरेकर व त्यांच्या कुटुंबियांना धमकावून तुमचा कार्यक्रम लवकरच करतो, अशी धमकी दिली. तसेच, अनंत दुंदरेकर यांनी सुद्धा विजय दुंदरेकर यांच्या पाठीवर लाकडी बॅटने मारहाण केली. या संदर्भात विजय दुंदरेकर, विनय दुंदरेकर व गीता दुंदरेकर यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु, या तक्रारीची योग्य ती दखल पोलिसांकडून घेतली जात नसल्याचे दुंदरेकर कुटुंबियांचे म्हणणे आहे. तरी याबाबत या चौघांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच, पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील विजय दुंदरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.






