। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला ‘आयएसआयएस-काश्मीर’ या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. गंभीरला 22 एप्रिलला एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी ‘आयकीलयू’ असा संदेश असलेले दोन ईमेल मिळाले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर या धमक्या देण्यात आल्या. गौतम गंभीरने स्वतः सोशल मीडियावर दुःख आणि संताप व्यक्त केला आहे आणि जबाबदार असलेल्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. त्यानंतर गौतम गंभीरला धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, धमकी मिळाल्यानंतर गंभीरने दिल्ली पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. तसेच, राजिंदर नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि मध्य दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांच्याशी संपर्क साधला आणि अधिकार्यांना त्याच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. या आधी नोव्हेंबर 2021 मध्ये गंभीरला खासदार असताना अशीच धमकी मिळाली होती.