हॉटेल व्यावसायिकाविरोधात तक्रार दाखल
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
दक्षिण काशी हरिहरेश्वर येथे एका हॉटेल व्यावसायिकाने समोरच्या व्यक्तीला भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिका विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर येथे देवदर्शनासाठी पर्यटक येत असतात. सद्यःस्थितीत रस्ता मंदिराकडे जाण्याचा संपतो, तेथे येथील हॉटेल मालकाने गेट बसविल्यामुळे व त्याची कोणतीही कल्पना मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत किंवा पोलीस प्रशासन यांना न दिल्याने येणाऱ्या भाविकांना गाडी वळविण्यास शक्य होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता नंदनवन हॉटेल येथे भाविकांची गैरसोय होऊ नये या कारणास्तव पोलीस प्रशासन यांनी रस्त्यावर बॅरिकेड्स उभी केली होती. यादरम्यान एक अज्ञात व्यक्ती बॅरिकेड्स बाजूला करताना सिद्धेश पोवार यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तीला बॅरिकेड्सबाबतीत विचारले असता आमच्या मालकाजवळ बोला असे सांगितले; परंतु कोण मालक आहे हे अज्ञात व्यक्तीने सांगितले नाही.
काही वेळाने राजकुमार चंद्रसेन चव्हाण या हॉटेल व्यावसायिकानी बॅरिकेड्स बाजूला केल्याच्या बाबतीत विचारणा केल्याचा राग मनात ठेवून सिद्धेश यांचे बंधू सुयोग पोवार यांना भ्रमणध्वनीवरून तुझे डोके फोडून टाकीन व तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारीन, अशी धमकी दिली. सिद्धेश सुनील पोवार हे हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थानचे सचिव व खजिनदार असून, सिद्धेश यांनी याबाबत श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे रितसर तक्रार नोंदवली आहे. चव्हाण याच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.







