पनवेल महानगरपालिकेची कारवाई
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत पनवेल महानगरपालिकेने धडाकेबाज कारवाई करत 3 हजार 500 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून, 25 हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या नियंत्रणात पनवेलच्या सर्व विभागात ही मोहीम राबविली. मात्र जप्त केलेल्या साडेतीन टन प्लास्टिकची विल्हेवाट कशी आणि कोण लावणार, याबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पनवेल महानगरपालिका हद्दीत चारही प्रभाग समितीनिहाय प्लास्टिकबंदी कारवाई करण्यात आली. यामध्ये कामोठेतील क प्रभागात सुमारे 300 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये प्लास्टिकचे चमचे, ग्लास, वाट्या, प्लेट यांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच यावेळी एकूण दहा हजार दंड जमा करण्यात आला. याशिवाय नावडे, खारघर, कळंबोली व पनवेलमध्येही कारवाई करण्यात आली.पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करून पनवेल महानगरपालिका प्लास्टिकमुक्त करण्याच्यादृष्टीने महापालिकेस मदत करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले.
या पिशव्यांवर बंदी
एकल प्लास्टिकचा वापर मार्च 2018 पासून प्रतिबंधित आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स), हँन्डल असलेल्या व नसलेल्या कंपोस्टेबल व प्लास्टिक (कचरा व नर्सरीसाठीच्या पिशव्या सोडून) सर्व प्रकारच्या नॉन ओव्हन पॉलीप्रोपीलीन बॅग्स 60 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या यावरती बंदी आहे.
1) प्लास्टिकच्या कांड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी, कांड्या, आईस्क्रीम कांड्या तसेच सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल) यावर बंदी करण्यात आली आहे.
2) दुकानदारांनी कंपोस्टेबल पदार्थापासून बनविण्यात आलेले एकल वस्तू उदा. स्ट्रॉ, ताट, कप्स, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर इ. तथापि, कंपोस्टेबल पदार्थापासून प्लास्टिकपासून बनविलेल्या अशा वस्तू कंपोस्टेबल असल्याबाबत सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ प्लास्टीक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक राहील.
पालिकेच्यावतीने कारवाईत जप्त करण्यात आलेले प्लास्टिक सामाजिक संस्थांना देण्यात येते. त्यानंती या संस्था प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करतात.
डॉ. वैभव विधाते,
उपायुक्त, पनवेल महानगरपालिका