| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. त्यातील तीन आरोपींना शनिवारी कणकवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जगदीश श्रीराम यादव (25) रा. भिवंडी, चनाप्पा साईबाणा कांबळे (50) रा. ठाणे, नागेश हनुमंत माने (41) रा. नेरूळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना फोंडा गाडी येथे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या, तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्यान वरील तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या तक्रारीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती. याबाबत कणकवली व एलसीबी पोलीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता. संशयितांचा ठावठिकाणा आढळल्यानंतर एलसीबीची टीम पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली. अखेर एलसीबीच्या पथकाने तिन्ही संशयितांना शोधून ताब्यात घेतले.







