। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गस्ती पोलिसांच्या सतर्कतेने करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी कोणाची हत्या करण्यासाठी गावठी कट्टा आणला होता, की कोणास विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करीत आहेत.
सौतमरतन प्रकाश सिंग (वय 24वर्षे, सेक्टर 19, कोपरखैरणे, नवी मुंबई, मूळ राहणार परवेजनगर, जि. बदायु, तहसिल, भिसोली, उत्तरप्रदेश), पिंटु सोमपाल कुमार (वय 22 वर्षे, धंदा शेती, राहणार सेक्टर 19 कोपरखैरणे, नवी मुंबई, मूळ गाव राजघाट, जिल्हा बुलंदशहर, उत्तर प्रदेश) आणि अभय बॉबी राजपुत (वय 24, कोपरखैरणे सेक्टर 19, नवी मुंबई, मूळ राहणार परवेजनगर, जिल्हा बदायु, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
14 ऑगस्टला कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार ललित महाजन यांना सेक्टर 23 येथील शांतिदूत महावीर उद्यान, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाजूला, असणाऱ्या पेट कॉर्नरजवळ संशतीतरित्या फिरत आहेत, अशी माहिती मिळाली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना ही माहिती देताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे, पोलीस हवालदार महाजन, चिकणे, पोलीस शिपाई दोंदे, परदेशी, भांगरे, कानवडे, साळुंखे, आणि यादव हे पथक रवाना केले. सेक्टर 23 व परिसरात शोध घेतला असता तिन्ही संशयित सापडले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे आढळली.
बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आले आहे. संशयित आरोपीनी हे बेकायदा शस्त्र कशासाठी, कोणासाठी आणले की स्वतः वापर करत होते याबाबत तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे.




