सोन्याची चैन चोरणारे त्रिकूट जेरबंद

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील एम.जी.एम. टपाल नाका येथे असलेल्या किरण ज्वेलर्स या दुकानातून आरोपी त्रिकुटाने दुकानदाराचा विश्‍वास संपादन करून त्याच्याकडील असलेली 2 लाख 31 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हातातून हिसकावून पसार झालेल्यांना पनवेल शहर पोलिसांनी सदर सोन्याच्या चैनसह व गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले आहे.

शहरातील टपाल नाका एम.जी. रोड येथे असलेल्या किरण ज्वेलर्स या ठिकाणी रवींद्र घुले (24), नितीन डमाळे (32) व रामकिशन ढाकणे (32) हे तिघे दुकानात येऊन त्यांनी प्रकाशचंद्र शर्मा यांचा विश्‍वास संपादन करून त्या दुकानात असलेली 2 लाख 31 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ही सुनील सुखलाल याच्या हातातून हिसकावून ते त्यांच्या ताब्यात असलेल्या व्हॅगेनार गाडीतून पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पो.हवा. अमोल पाटील, संदेश म्हात्रे, महेश पाटील, पो.ना. मिथुन भोसले, पो.शि. विशाल दुधे, किरण कराड आदींच्या पथकाने त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाद्वारे या गुन्ह्यातील आरोपी हे पुणे परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून या तिन्ही आरोपींना सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली व्हॅगेनार गाडीसह ताब्यात घेतले आहे. या त्रिकुटापैकी रवींद्र घुले हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाणे, सोनाई पोलीस ठाणे, शेगाव पोलीस ठाणे, चकलंबा पोलीस ठाणे या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version