खारघरमध्ये तीन बांगलादेशी जेरबंद

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर, सेक्टर- 21 मधील तपोवन सोसायटीतील घरावर छापा मारुन दोन महिला आणि एक पुरुष अशा तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.

पोलिसांनी चौथ्या बांगलादेशी नागरिकाचा शोध सुरु केला असून, सदर चारही बांगलादेशी नागरिक मागील दहा वर्षांपासून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे तसेच त्यातील एका जोडप्याने आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच निवडणूक ओळखपत्र बनवून घेतल्याचे उघडकीस आहे. खारघर, सेक्टर-21 मधील तपोवन सोसायटीत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे आणि त्यांच्या पथकाने तपोवन सोसायटीतील संशयित घरावर छापा मारला. यावेळी सदर घरामध्ये शकीला कादिर शेख (37), तिचा पती कादिर हबीबुल शेख (40) याच्या सोबत राहत असल्याचे तसेच रुकसाना अमिरुल घरामी (34) आणि तिचा पती अमिरुल दिनो घरामी (34) असे दोघे खारघर, सेक्टर-13 मधील एका बिल्डींगमध्ये राहात असल्याचे आढळून आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सदर तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आढळून आले. मात्र, त्यातील शकीला कादिर शेख आणि तिचा पती कादिर हबीबुल शेख या दोघांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवडणूक ओळखपत्र जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले.

Exit mobile version