मौलवीकडून विशेष पूजेच्या नावाखाली फसवणूक
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
तंत्रमंत्रातून करणी काढण्याच्या बहाण्याने एका मौलवीने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका तरुणाकडून तब्बल 3 कोटी 10 लाख रुपये उकळले आहेत. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दारावे गावातील तेजस घोडेकर (22) याची आई भारती घोडेकर नऊ वर्षांपासून आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहे. तेजसने अनेक रुग्णालयांमध्ये उपचार करून पाहिले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. 2019 मध्ये सीवूड्स-दारावे गावातील दर्ग्याविषयी त्याला माहिती मिळाली होती. वडिलांसोबत त्याने मौलवी मुस्तफा शेख ऊर्फ कांबळेची भेट घेतली होती. मुस्तफाची मुलगी सफीनाने तेजसला आईवर करणी केल्याचे सांगत 50 हजार रुपये घेतले. नंतर तिचा भाऊ आहात शेखने संपर्क साधत तंत्रविद्येतून आई बरी होईल, असे सांगून विश्वास संपादन केला. काश्मीर विशेष पूजाविधीसाठी तब्बल 3 कोटी 10 लाख खर्च केले, पण आईच्या प्रकृतीत फरक पडला नसल्याने तेजसने डिसेंबर 2024 मध्ये पैसे परत मागितले. त्या वेळी आहात शेखने 19 लाख रुपये परत केले; मात्र उर्वरित रक्कम मागितल्यावर तेजससह त्याच्या कुटुंबाला करणी करून ठार मारू, अशी धमकी दिली होती.
सहा जणांविरोधात गुन्हा
नेरूळ पोलिसांनी मौलाना मुस्तफा शेख ऊर्फ कांबळे, त्याचा मुलगा आहात शेख, मुलगी सफीना नानू शेख, जावई नानू शेख, वसीम शेख, वडील रफिक शेख यांच्याविरोधात फसवणूक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.







