36 हून अधिक नागरिक गंभीर जखमी
| केरळ | वृत्तसंस्था |
केरळमधील कलामासेरी येथील ख्रिश्चन धर्मियांच्या प्रार्थनास्थळी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 36 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी कोची येथील रहिवाशाने घेतली आहे. त्याने त्रिशूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.
सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास स्फोट झाल्याबद्दल पोलिसांना फोन आला. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर एनआयएचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. एका पाठोपाठ तीन स्फोट झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे. एर्नाकुलममधील अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिस महासंचालकांशी चर्चा केली आहे. तपासानंतर अधिक माहिती मिळेल, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले.
आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने माघारी बोलावले आहे. स्फोटात जखमी झालेल्यांना उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाचे संचाक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना जॉर्ज यांनी निर्देश दिले आहेत.
मुंबईत हायअलर्ट केरळमध्ये झालेल्या स्फोटनंतर मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी खाबड हाऊस इमारतीच्या गल्लीमध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. खाबड इमारतीच्या गल्लीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची आणि नागरिकांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. केरळमध्ये झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे. चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. केरळमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह, पुणे आणि दिल्लीतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.