तळीरामांचा घसा राहणार कोरडा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मद्यप्रेमींना डिसेंबर महिन्यातील पहिले तीन दिवस पाण्यावरच तहान भागवावी लागेल. त्यांच्या घशाला दारुचा शेक बसणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानूसार सलग तीन दिवस दारुची दुकानं बंद राहतील. नगरपरिषद, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन दिवस ड्राय डे असेल. येणाऱ्या आठवड्यात सोमवार (दि.1) ते बुधवार (दि.3) पर्यंत दारुची दुकानं बंद राहणार आहेत. तरबेज मद्यप्रेमींनी त्यासाठीची तजवीज अगोदरच केली असेल. पण त्या दिवशी दारुची दुकाने सुरु राहणार नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे तजवीज नसेल त्यांचा घसा मात्र कोरडा राहणार आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, खोपोली, श्रीवर्धन, मुरूड-जंजिरा, रोहा, महाड, पेण, उरण, कर्जत, माथेरान या नगरपरिषदांमध्ये नगरसेवकपदासाठी 595 व नगराध्यक्षपदासाठी 34 आणि नगरसेवकपदासाठी 595 असे एकूण 629 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या नगरपरिषदांच्या हद्दीत 107 प्रभाग आहेत. नगराध्यक्षपदाच्या दहा आणि नगरसेवकपदाच्या 217 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान दोन डिसेंबरला 308 केंद्रामध्ये होणार आहे. दोन लाख 37 हजार 503 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.या कालावधीत दारु पिऊन काही गैरप्रकार तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून प्रशासनाने कडक पावले उचलली आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या मदतीने दारु विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर अंकुश ठेवला जाणार आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी सोमवारी(दि.01ते बुधवारी (दि.3) डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत सर्व देशी,विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. सोमवारपासून दारु पिण्याबरोबरच विक्री, वाहतूक व निर्मितीला बंदी असल्याने अनेकांचे घसे कोरडे राहणार आहेत. त्यामुळे शनिवारपासूनच अनेकांनी दारु विक्रीच्या दुकानात गर्दी करून दारु खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, अशी सक्त ताकीद प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. या कालावधीत किरकोळ दारु विक्रेत्यांपासून ताडीमाडी विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील रायगडचे अधीक्षक रविंद्र कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले आहेत. दारु विक्री करणाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल. त्यामुळे दारु पिणाऱ्यांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील तीन दिवस दारुची दुकाने बंद राहणार असल्याने दारुविनाच राहण्याची वेळ मद्यप्रेमींवर येणार आहे.
डिसेंबरला आठवडा बाजार बंद
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मतदार संघात मंगळवारी (दि.2) मतदान होणार असून मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच मतदान सुरळीतपणे पार पडणे आवश्यक असल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रातील) नगरपरिषद, नगरपंचायत मतदार संघात ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरणार आहे, अशा सर्व ठिकाणी बाजार व जत्रा अधिनियम, 1862 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार आठवडा बाजार पूर्णवेळ बंद ठेवण्याबाबतचा बंदी आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत मतदार संघामध्ये मंगळवारी (दि.2) मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
निवडणूकीच्या कालावधीत विशेष म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवसापासून ते मतमोजणी होईपर्यंत एक ते तीन डिसेंबर या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार दारु विक्रेत्यांना सुचना दिल्या आहेत. या कालावधीत कोणी दारु विक्री करीत असल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल.
-रविंद्र कोले
अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क, रायगड
महिनाभरात 42 लाख बल्क लिटर दारुची विक्री
रायगड जिल्हयामध्ये ऑक्टोबर महिन्यात 42 लाख 52 हजार सहा बल्क लिटर इतकी दारु विक्री झाली आहे. त्यात देशी दारुची विक्री आठ लाख 96 हजार 510 बल्क लिटर, विदेशी दारुची विक्री सात लाख 96 हजार 347 बल्क लिटर तसेच 25 लाख 59 हजार, 149 बल्क लिटर इतकी बिअरची विक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क रायगड विभागाकडून देण्यात आली आहे.
299 जणांविरोधात कारवाई
रायगड जिल्हयात गावठी दारुसह देशी, विदेशी, बिअरची विक्री, वाहतूक, निर्मिती बेकायदेशीररित्या करणाऱ्यांना रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात 299 जणांविरोधात 315 गुन्हे दाखल केले असून 90 लाख 55 हजार 810 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात 34 वाहनांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सोमवार ते बुधवार या कालावधीत ड्राय डे तथा कोरडा दिवस असणार आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत दारु विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. अनेकजण शनिवारबरोबरच रविवारी दारु विक्रीसाठी गर्दी करणार आहेत. रविवारी दारुची मागणी जास्त होणार आहे. त्यामुळे शनिवारी दारुचा अधिकचा साठा दुकानांमध्ये आणला जाणार आहे.
–दारु विक्रेते,
अलिबाग







