गंभीर गुन्ह्यातील तिघे तडीपार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी चोरी, घरफोडीसह 13 गंभीर गुन्हे करणाऱ्या तिघांना तडीपार केले आहे. रायगड जिल्ह्यासह जिल्ह्यालगत असलेल्या पुणे, नवी मुंबईमधून त्यांना हद्दपार करण्याचे आदेश रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी काढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जिवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील निंबोडे दांडवाडी येथील रहिवासी असणारा मंगेश पवार (26) हा चोरी, घरफोडी आदी गुन्ह्यातील टोळी प्रमुख आहे. खालापूरमधील शिरवली येथील किशोर पवार(25) आणि आनंदवाडी येथील गुरुनाथ हिलम (27) हे दोघेज टोळीतील सदस्य आहेत. खालापूर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या या तिघांनी गुन्हेगारी टोळी तयार केली. त्यांनी 2017 पासून 2025 या कालावधीत चोरी, जबरी चोरी, घरफोडीसारखे 13 गुन्हे केले आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातमध्ये त्यांच्याविरोधात गून्हे दाखल आहेत. आर्थिक फायद्याबरोबच दहशत निर्माण करण्यासाठी खालापूर परिसर आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चोरी, लुटमार दरोडा टाकून आर्थिक व मालमत्तेची लुट करीत होते. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून कारागृहातही ठेवण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही, ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. नागरिकांच्या जिवीतास आणि मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न या टोळीमुळे निर्माण झाला आहे. महामार्गावरून मालवाहतूक करणारे चालक आणि प्रवासी वर्गांमध्ये दहशत व भिती निर्माण झाली होती. ही भिती दुर करण्यासाठी पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी त्यांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन वर्षांसाठी रायगडसह नवी मुंबई व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version