नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला
| रायगड | खास प्रतिनिधी |
इन्कमटॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करुन रोहा शहरातील एका व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी ठरला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये फैयाज कादिर काझी (52) रा. सोमठणे-पुणे, मोहम्मद गौस उमर शेख राहणार सिद्धिविनायक बिल्डिंग अंबरनाथ-ठाणे, कुदबुद्दीन दाऊद सय्यद (39) रा. अंबरनाथ-ठाणे यांचा समावेश आहे. तसेच आयाज शेख असे पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोहा शहरातील खालचा मोहल्ला येथे मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी (38) राहतात. ते व्यवसायाने दुकानदार आहेत. त्यांच्या राहत्या घरात चार व्यक्ती इन्कमटॅक्स अधिकारी असल्याचे सांगून आले. त्यांनी त्यांच्याकडील ओळखपत्र दाखवले. त्यानंतर त्यांनी मोहम्मद अन्सारी यांचे वडील शौकत अन्सारी यांच्या नावाचे सर्च वॉरंट दाखवले आणि घराची झडती घेण्यास सुरुवात केली. याबाबत मोहम्मद यांना त्या व्यक्तींचा संशय आला. त्यांनी तातडीने सदरची बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांना कळविले म्हणून त्यांनी अन्सारी कुटुंबाला शिव्या दिल्या, तसेच दमदाटी केली. त्यावेळी मोहम्मद यांची वहिनी तेथे आली असता त्यातील आरोपी हरमीद सुमिद सिंग या इसमाने वहिनीच्या गळ्यातील चेन जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला अटकाव करत असतानाच तेथे पोलीस आणि आजूबाजूचे लोक तेथे आल्याने त्यातील एक इसम पळून गेला. या घटनेची फिर्यादी मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांनी दिली.