। नांदेड । प्रतिनिधी ।
उजनी, इगतपुरी, प्रवरागनर येथे पाण्यात बुडून अनेकजण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच, नांदेड जिल्ह्यातून आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. किनवट तालुक्यातील मारेगाव येथे पाण्यात बुडून 3 मुलींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.27) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (12), पायल देविदास कांबळे (16) आणि ममता सुरेश विविधकर (19) या तीनही मुली आपल्या कुटुंबीयांसोबत सहलीसाठी गेल्या होत्या. त्याचवेळी किवटजवळ असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये एक जण पाय घसरून पडली. तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मामीडवार हे करीत आहेत.