23 तारखेला कोल्हापूर, जळगाव येथे खेळणार
। कर्जत । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने नुकतीच पुणे इथे 19 वर्षाखालील मुलींची आमंत्रित लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणार्या मुलींची सुपर लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि प्रशिक्षक मनीषा अडबल यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली आता पुढे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नाव उज्वल करण्यासाठी 23 तारखेला खेळण्यासाठी जाणार आहेत. या तिघींपैकी दोन मुली कोल्हापूर इथे तर एक मुलगी जळगाव येथे खेळण्यासाठी जाणार आहे.
पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने 19 वर्षांखालील मुलींच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. यामधे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून संघ पाठवण्यात आला होता. यावेळी रायगड संघाने तीन सामन्यांपैकी एकाच सामन्यात विजय मिळवला होता. यामधे गोलंदाजीमध्ये पेस बॉलर अंजली गोडसेने तर स्पिनर मध्ये समिधा तांडेल आणि ऑलराउंडर मध्ये रोशनी पारधीने चांगली कामगिरी केल्याने या तिघींची सुपर लीगसाठी निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून रायगड जिल्ह्यात मुलींच्या क्रिकेट लीगला गेल्या तीन वर्षांपासून सुरवात करण्यात आली आहे. गेली तीन वर्षापासून असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, संदिप पाटील आणि प्रशिक्षक तथा टीम मॅनेजर मनीषा अडबल हे खूप मेहनत घेत आहेत. या तिघिंपैकी रोशनी पारधी (महाड) आणि समिधा तांडेल (खोपोली) या कोल्हापूर येथे तर अंजली गोडसे (पनवेल) ही जळगाव येथे सुपर लीग स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहेत.