गुरुजी, सांगा आम्ही खेळायचे कुठे?

तीनशे शाळा मैदानाविना

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 304 शाळा मैदानाविना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शाळेतील पाच हजारहून अधिक विद्यार्थी मैदानी खेळापासून वंचित राहण्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळांना मैदान असणे आवश्यक आहे, तसा नियमही आहे. परंतु, जिल्ह्यातील शेकडो शाळांना मैदानेच नाहीत, याबाबतचे वास्तव नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला काही दिवस बाकी असतानाच ‘कृषीवल’ने उघडकीस आणले आहे.

रायगगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या अडीच हजारांहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एक लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांच्या वेळापत्रकात आठवड्यात दोन ते चार तास खेळाचे असतात. पण, मैदानच नसल्याने खेळायचे कुठे, असा प्रश्‍न मुलांना पडतो.

जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटावे यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. आठवड्यातील ‘एक वार दप्तराविना’सारखे उपक्रम घेऊन मुलांमधील शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे खेळ भरविले जात आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळा मैदानाविना असल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे.

जिल्ह्यातील दोन हजार 566 शाळांपैकी 304 शाळा मैदानाविनाच आहेत. त्यामध्ये कर्जतमध्ये 32, माणगावमध्ये 34, पनवेलमध्ये 57, पोलादपूरमध्ये 47, रोहामध्ये 35, महाडमध्ये वीस, म्हसळामध्ये 18, अलिबागमध्ये 15, खालापूर, श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी नऊ, मुरूडमध्ये आठ, सुधागडमध्ये तीन, उरणमध्ये दोन, आणि पेणमध्ये एक अशा एकूण 304 शाळांसमोर मैदान नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामध्ये पनवेल, कर्जत, माणगाव, पोलादपूर, रोहा या तालुक्यातील शाळांचा अधिक समावेश आहे. मैदानी खेळाअभावी विद्यार्थ्यांना शाळेत खेळ खेळण्यास अडचणी निर्माण होत आहे.

काही शाळांचे मैदान खासगी जागेत
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये हक्काचे मैदान नाही. त्यामुळे शाळेशेजारी असलेल्या खासगी मोकळ्या जागेत शाळांचे मैदान उभारण्यात आले. त्याची नोंद शाळेतील मैदान म्हणून केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळा मैदान नसूनदेखील असल्याचे दाखविले जात आहेत.
मैदानाच्या जागेत बांधकाम
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या समोर भले मोठे मैदान यापूर्वी होते. मैदानाच्या चारही बाजूला फुलांचे गार्डन, तर मध्यभागी खेळण्यासाठी मैदान होते. मात्र, या मैदानाच्या जागेत नवीन वर्ग सुरू करण्यासाठी बांधकाम करण्यात आले. त्यामुळे मैदानाची जागा बांधकामात गेली. परिणामी, मैदानच गायब झाल्याचे दिसून येत आहे.
Exit mobile version