तरुणीच्या छेडछाडप्रकरणी तिघांना कोठडी

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील सीएनजी पंपावर बोरगाव येथील तरुणीची छेडछाड करण्यात आली होती. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर नेरळ पोलिसांनी दामत गावातील तीन तरुणांना ताब्यात घेतले होते. त्या तरुणांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन ऑगस्ट रोजी बोरगाव येथील तरुण आकाश पाटील हा आपली रिक्षा घेऊन सीएसनजी पंपावर इंधन भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत असललेली त्याची बहीण गाडीमध्ये इंधन भरले जात असताना सीएनजी पंपाच्या कोपर्‍यावर उभी होती. त्यावेळी तेथे सिल्व्हर रंगाची स्विफ्ट गाडी घेऊन आलेल्या दामत गावातील चार तरुणांनी त्या तरुणीला हातवारे केले तसेच अश्‍लील चाळे करीत तिच्या मनात लज्जा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल रिक्षा घेऊन बहिणीजवळ आलेल्या आकाश पाटील याने बहीण घाबरलेली बघून तिला विचारल्यावर घडलेला प्रकार सांगितला होता. त्यामुळे गाडीमधील तरुणांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर डोके फुटेपर्यंत मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात नेरळ पोलिसांनी दामत गावातून मुझमिल मलिक बुबेरे-27, फरान नासिर नजे -25 आणि तिघांना ताब्यात घेतले. तर, त्यातील चौथा तरुण हा वयाने 16 वर्षांचा असल्याने अद्याप अटक करण्यात आली नाही. या तिन्ही आरोपींना नेरळ पोलिसांनी कर्जत दिवाणी न्यायालयात हजार केले असता त्या सर्वांना पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्या सर्व चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version