पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यात मोठी दुर्घटना झाल्याच समोर येत आहे. पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज सकाळी  हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर असे तिघ जण होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते  मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. अपघाताचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना आहे, काही दिवसांपूर्वी मुळशीमध्ये देखील अशीच घटना घडली होती. सुदैवाने त्या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती.

बावधन याठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. मात्र, हा भाग डोंगराळ असल्याने या ठिकणी दाट धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. बावधन बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काऊंटी आणि एच.ई.एम.आर. एल. संस्थाच्या जवळील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळले. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य आहे. हिंजवडी पोलीसांच्या कंट्रोल रुमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, पोलीस आणि इतर यंत्रणा बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, या भीषण अपघातामध्ये वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचाही मृत्यू झाला होता. येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात. त्यांना थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे. पुणे -बंगळुरु महामार्गही येथून काही अंतरावरच आहे. त्यामुळे अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात.

सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघाले होते हेलिकॉप्टर 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर बावधन येथून निघाल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.  मुंबईला पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टर कोसळले आहे.
Exit mobile version