महिलेच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी

सुपारी किलरसह सहाजण जेरबंद

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर 15 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या प्रियंका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा खांदेश्‍वर पोलिसांनी छडा लावला. या हत्या प्रकरणात सहभागी असलेला प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकीता मतकर, सुपारी किलरना हत्येची सुपारी देणारा निकीताचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तिघे सुपारी किलर अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांनी मिळून प्रियंकाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पनवेल मधील विहीघर येथे राहणारा मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याचे निकीता मतकर (24) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमात प्रियंका अडसर ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढल्यास देवव्रतसिंग सोबत आपल्याला पत्नी म्हणून कायमचे राहता येईल, असा विचार निकीताने केला होता. याच विचारातून या दोघांनी प्रियंकाची सुपारी देऊन तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, निकीता मतकर प्रविण घाडगे या क्लास चालकाकडे टिचर म्हणून काम करत असल्यामुळे तिने प्रविण घाडगे याला प्रियंकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगे याने बुलढाणा येथील सराईत गुन्हेगार असलेल्या 3 सुपारी किलरला 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती. तसेच त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम आगाऊ देऊन हत्येनंतर 1 लाख रुपये देण्याचे त्यांना कबूल केले होते. तिघा सुपारी किलरने 15 सप्टेंबर रोजी प्रियंका कामाला असलेल्या ठाण्यातील तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली होती. तसेच तिचा ठाण्यापासून पनवेल पर्यंत लोकलमधून देखील पाठलाग केला. प्रियंका पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तिघा सुपारी किलरपैकी पंकज नरेंद्रकुमार यादव (26) याने पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रियंकाच्या गळ्यावर चाकुने वार करुन तिची हत्या करुन पलायन केले होते.

खांदेश्‍वर पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. या तपासादरम्यान प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे निकीता मतकर हिच्यासोबत प्रेमसंबध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग आणि निकीता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यांनतर निकीता मतकर हिने प्रियंकाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले.त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग, निकीता मतकर आणि प्रविण घाडगे या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करुन बुलढाणा येथून रोहीत उर्फ शिव उर्फ रावत राजू सोनोने (22), दिपक दिनकर लोखंडे (25) आणि पंकज नरेंद्रकुमार यादव या तिघांना बुलढाणा येथून अटक केली. सदर तिघेही सुपारी किलर मुंबईत सराईत गुन्हेगार असून, पाचोरा येथील एका फायरींगच्या गुन्ह्यात तिघे आरोपी फरार आहेत.

Exit mobile version