अकोला येथील राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
| नवी मुंबई । वार्ताहर ।
अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार वरटे यांनी तीन पदके पटकावून घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेत त्यांनी दोन गोल्ड मेडल, तर एक सिल्वर मेडल मिळवले आहे. त्यांच्या यशाबद्दल रेल्वे पोलीस दलातून कौतुक होत आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग वरूटे यांनी अकोला येथे झालेल्या 42 व्या महाराष्ट्र राज्य मास्टर अॅथलेटिक राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. यासाठी क्रीडा प्रशिक्षकांसह वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटोर व इतरांनी त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यानुसार वरूटे यांनी स्पर्धेत इतर स्पर्धकांवर मात करत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल, थाळीफेक स्पर्धेत गोल्ड मेडल तर गोळाफेक स्पर्धेत सिल्वर मेडल पटकावले आहे. या यशामुळे त्यांची हैदराबाद येथे होणार्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.