| उरण | प्रतिनिधी |
उरणच्या बौद्धवाडा परिसरात 10 नोव्हेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी आणि मुलगी निकिता तिघेही गंभीर भाजले होते. उपचार सुरू असतानाच 11, 14 आणि 19 नोव्हेंबर रोजी तिघांनीही अखेरचा श्वास घेतला. मासळी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या कांबळे कुटुंबाच्या घराला मध्यरात्री अचानक आग भडकली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात असले, तरी परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “ही साधी आग नाही; सखोल चौकशी व्हावी” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. या मृत्यूमुळे उरण हादरून गेले असून, पोलिसांनी तातडीने विस्तृत तपास सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.







