जखमींमध्ये दोन महिलांसह बालकाचा समावेश
| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील शेलटोली खैराट आदिवासी वाडीवर असलेल्या समाज मंदिराची भिंत कोसळून समाज मंदिरामध्ये झोपलेल्या दोन महिला आणि एक चार वर्षीय बालक जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे सहा वाजता घडली. जखमींवर महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.
शेलटोली खैराट आदिवासीवाडी या ठिकाणी पंधरा वर्षे जुनी समाज मंदिराची इमारत आहे. या समाज मंदिरामध्ये दोन दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे कुटुंब वस्तीला आले होते. सकाळी झोपेत असताना या समाज मंदिराची भिंत कोसळली. यामध्ये दोन महिला आणि एक चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे. आदिवासी वाडीवरील लोकांनी या जखमींना खासगी वाहनातून महाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. महाड औद्योगिक पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस रुग्णालयात दाखल झाले. जखमींमध्ये गुजारी इंद्रजित ठाकूर (19), ज्युली राजपूत ठाकूर (20) या दोन महिलांसह भाग्य रजपूत ठाकूर (4) असे तीन जण जखमी झाले आहेत. घरातील पुरुष कामाच्या शोधात बाहेर गेले असताना ही घटना घडली.
दोन दिवसांपूर्वी मजुरी करण्यासाठी आपण आलो असल्याची माहिती खैराट आदिवासी वाडीवरील सरपंच यशवंत पवार यांनी देऊन सदर समाज मंदिराचे काम बर्याच वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, त्याच्या पायाचा भाग कोसळलेला होता. दोन दिवस थांबून आम्ही जाणार असल्याची माहिती या कुटुंबांनी दिल्यामुळे त्या ठिकाणी ते आश्रयाला होते, असेही सरपंच यशवंत पवार यांनी सांगितले.