घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

पोयनाड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 23.73 लाखांचा ऐवज जप्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


अलिबाग तालुक्यातील भाकरवड व नवीन देहेन परिसरात घडलेल्या घरफोडी व चोरीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा पोयनाड पोलिसांनी यशस्वी छडा लावत महिलेसह तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 23 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाकरवड येथील नरेंद्र पाटील यांच्या चाळीत बिहारमधील कुंदनकुमार सिंग व इतर काहीजण भाड्याने राहत होते. शनिवार (दि. 18) रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 दरम्यान अज्ञात चोरट्याने खिडकीचा लॉक तोडून घरात प्रवेश केला. त्याने पाच मोबाईल व 3 हजार रुपयांची रोकड असा एकूण 68 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोयनाड पोलिसांनी तांत्रिक तपासासह सराईत गुन्हेगारांची माहिती घेत तपास वेगात सुरू केला. चाळीतील रहिवासी दिवसा कामावर गेल्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेत शास्त्रीनगर येथील अनिल राठोड (24) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत दारूच्या व्यसनासाठी चोरी करत असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात 2018 साली घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे. अवघ्या 12 तासांत हा गुन्हा उघडकीस आणत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, नवीन देहेन येथे सोमवारी (दि. 13) मध्यरात्री ते पहाटे दरम्यान दुसरी घरफोडी घडली होती. या घटनेत 18 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने, 4 लाख रुपयांची रोकड आणि 85 हजार रुपयांचे तीन मोबाईल असा एकूण 23 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमून नवी मुंबई परिसरात शोधमोहीम राबवली. उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शुभम जयस्वाल व राणी चव्हाण-जयस्वाल या दोघांना तुर्भे येथून अटक करण्यात आली. राणीने शुभमच्या मदतीने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून 23 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


13 ते 18 एप्रिलदरम्यान पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावत तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण 23 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, सहाय्यक फौजदार नवनाथ म्हात्रे, पोलीस हवालदार सुरेश वाघमारे, मंगेश लांगी आदींच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Exit mobile version