| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पिस्तूलचा धाक दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाकडून 50 हजार रुपये हिसकावून घेणे आणि लाखो रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार मयुरेश गंभीरसह तिघांना पोयनाड पोलिसांनी अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. मयुरेश गंभीरला खंडणी मागणे महागात पडले आहे.
तक्रारदार चावला यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण चावला हे हॉटेल व्यावसायिक आहेत. अलिबाग तालुक्यातील नागझरी येथे ईलाईट हॉटेल ॲन्ड रिसॉर्ट आहे. त्या हॉटेलच्या ठिकाणी नवीन बंगल्याचे काम सुरु आहे. मयुरेश गंभीरसह तिघेजण बुधवारी (दि.4) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चावला यांच्या हॉटेलमध्ये आले. मी गँगस्टर असून, येथील सर्व हॉटेल व्यावसायिक दर महिन्याला पॅकेट पैसे देतात. हॉटेलजवळ बंगल्यांचे काम सुरु आहे. यातील एक बंगला माझ्या पत्नीच्या नावावर कर आणि मला 25 लाख रुपये दे, अशी धमकी दिली. मयुरेश गंभीर याच्या पत्नीने सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. तसेच लवेश याने रिसॉर्टमधील कामाचा ठेका मला द्या, असे हिंदीमध्ये सांगून धमकावले. त्यानंतर हॉटेलमधील रुमध्ये नेऊन पिस्तुलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी चावला यांच्या खिशातून 50 हजार रुपयांची रोकड हिसकावून घेऊन गायब झाले. ही घटना भरदिवसा घडली. याप्रकरणी चावला यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात मयुरेश गंभीर, मैथली गंभीर आणि लवेश या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले. अलिबागमधील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मयुरेशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मयुरेश गंभीरविरोधात पेण, पोयनाड, मांडवा सागरी, अलिबाग, उरण पोलीस ठाण्यात 18 गुन्हे दाखल आहेत.
खंडणी प्रकरणी मयुरेश गंभीरसह तिघांना अटक
