रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात; तिघेजण गंभीर जखमी

। वावोशी । वार्ताहर ।

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मृतदेह घेऊन जात असलेल्या बोलेरो टेम्पो अ‍ॅम्ब्युलन्सचा मागील टायर फुटल्याने गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चालक अशोक पटेल (26), रा. भिवंडी, ठाणे हा भरत बाबुराव पांचाळ यांचा मृतदेह आणि नातेवाईकांना घेऊन सोलापूरच्या वळसंग येथे जात असताना खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारद गावाजवळ अ‍ॅम्ब्युलन्सचा मागील टायर अचानक फुटल्याने ती पलटी झाली. या अपघातात वैजनाथ निवृत्ती पांचाळ (60), रंजना वैजनाथ पांचाळ (50), आणि अंतरा भरत पांचाळ (11), सर्व रा. भिवंडी, ठाणे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच खालापूर पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, आणि पळस्पे स्टाफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मृतदेह आणि नातेवाईकांना दुसर्‍या खाजगी ऍम्ब्युलन्सने गंतव्य स्थळी पाठवण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. वाहनांची नियमित तपासणी आणि सुरक्षित वाहतुकीसाठी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version