कळंब बाजारपेठेत तीन दुकाने फोडली

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब नाक्यावर असलेल्या बाजारपेठेतील तीन दुकाने पहाटे फोडली असून त्यातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तीन तरुण चोरी करताना दिसून येत आहेत.
कळंब भागातील सदगुरु मिडिकल, आयेशा मेडिकल आणि रविराज फोटोज अशी तीन दुकान पहाटेच्या वेळी फोडली.चोरट्यांनी त्यातील फोटो स्टुडिओ मधील कॅमेर्‍याच्या महागड्या लेन्स लंपास केल्या असून तेथील काही सामानाची मोडतोड केली आहे. तर सदगुरु मेडिकल स्टोर मधील पाच हजाराची रोकड आणि आयशा मेडिकल मधील चार हजाराची रक्कम लंपास केली आहे. त्यातील आयशा मेडिकल स्टोर मधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तीन तरुण दुकानात प्रवेश करीत असल्याचे स्प्ष्टपणे दिसून येत आहेत.तर दुकानातील कॅमेर्‍यात ते तरुण मोबाईलच्या बॅटरीमधून काही वस्तू शोधात असल्याचे दिसून आले आहे.
पोलीस चौकीत सदगुरु मेडिकलचे मालक महेश वासवानी, आयेशा मेडिकलचे मालक नदीम डोंगरे आणि रविराज फोटोजचे रवींद्र बदे यांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. या तरुणांनी जीन्स परिधान केल्या असून दोघांनी डोक्यावर हुडी परिधान केली आहे. सर्वांनी तोंडावर रुमाल बांधले आहेत. त्यामुळे नेरळ पोलिसांसाठी या घटना आव्हानात्मक अशाच आहेत.

Exit mobile version