बाजारपेठेतील चोऱ्यांचे प्रमाण वाढले
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ बाजारपेठ भागातील तीन दुकानांमध्ये पहाटेच्या वेळी चोऱ्यांची घटना घडली. या घटनेत मोठ्या प्रमाणात चिल्लर चोरून नेण्यात आली असून, त्यातील एका दुकानात तर चार महिन्यांतील तिसरी चोरी आहे. यामुळे व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील नेरळ बाजारपेठेमधील स्टेशन रोड-माथेरान रस्त्यावर असलेल्या तीन दुकानांत चोरीच्या घटना घडल्या. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ भागातील महेश कटारिया यांच्या किराणा दुकानात मागील चार महिन्यांतील तिसरी चोरीची घटना घडली आहे. त्या दुकानातून चिल्लर, रोकड आणि जिन्नस असा साधारण पाच हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या चोरीची घटना महेश कटारिया यांच्या दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, चोर चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. फ्रेंच कट दाढी असलेला हा तरुण उंच असून, पावसाळा असल्याने त्याने निळ्या रंगाचा रेनकोट घातलेला दिसून येत आहे.

दुसऱ्या घटनेत नजे मेंशनमध्ये असलेल्या नेरळ मोबाईल या दुकानात पहाटे तीनच्या दरम्यान चोरी झाली. त्या दुकानात चोरट्याने सात जुने मोबाईल लंपास केले असून, काही रोकडदेखील लंपास केली आहे. तर त्याच नेरळ मोबाईल या दुकानाच्या बाजूला असलेल्या ए वन फूट वेअर या दुकानातदेखील काही रोकड त्या चोरट्याने लंपास केली आहे. या तिन्ही चोऱ्या एकच चोरट्याने केल्या असल्याचे सीसीटिव्ही कॅमेरे यातून स्पष्ट होत आहे. या चोरीच्या घटनांमुळे नेरळ गावातील व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वी दिवसभर स्टेशन समोर जय हिंद हॉटेल आणि अंबिका नाका येथे पोलीस कर्मचारी तैनात असायचा. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून येत नाही. त्याचवेळी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांची भेट घेतली. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी नेरळ गावात पोलिसांची गस्त वाढविण्यात, यावी अशी मागणी केली आहे.
नेरळ पोलीस ठाण्यापासून एक किलोमीटर अंतरावरील नेरळ विद्या मंदिरासमोर एका बंगल्यात चोरी झाली होती आणि सोन्या-चांदीचे सव्वा चार लाखांचे दागिने लंपास केले आहेत. त्या चोरांचा देखील कोणताही तपास अद्याप लागला नाही.