अलिबागमध्ये फकिराच्या वेशात आढळले तीन संशयित; पहा व्हिडिओ

पोलिसांनी घेतले चौकशीसाठी ताब्यात 

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मुख्यालयाच्या चेंढरे बायपास येथे खांद्यावर फकीराची झोळी, डोक्याला रुमाल बांधलेला, ग्रह , नक्षत्र आणि  राशी चक्राच्या अंगठ्यांचा बॉक्स, खोटे आधार ओळखपत्र बाळगून जनतेची दिशाभूल करीत फिरणाऱ्या तीन संशयित तरुणांना अलिबागकर नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. तिघांच्या हालचालींवर नागरिकांनी करडी नजर ठेवून त्यांना घेरले. काही नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नांना त्या तरुणांना उत्तर देता आले नाही. यामुळे नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला आणि संशयित तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अलिबाग पोलीस ठाण्यात या तरुणांची कसून चौकशी सुरु होती.


अलिबाग शहरातील चेंढरे बायपास परिसरात फकिराच्या वेशात येऊन नागरिकांची दिशाभूल करणायचा प्रयत्न तीन तरुण करीत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. यामुळे त्या तिन्ही तरुणांना नागरिकांनी हटकले. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार अलिबाग बायपास येथे घडण्याअगोदर हे तीन संशयित तरुण चोंढी परिसरात फकिराच्या वेशात जाऊन आपले काम करत असताना तेथे देखील नागरिकांनी त्यांना हटकले होते. त्यावेळी या तिघांमधील दाढी असणारा संशयित तेथून पळून गेला होता. चेंढरे बायपास येथे आपल्या बोलबच्चनने या तरुणांनी आपल्या जवळील अंगठी विकण्यासाठीचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. हे तरुण फकिराच्या वेशात नागरिकांना फसविण्यासाठी आले आहेत. याचा अंदाज काही नागरिकांना आला. त्यांनी लगेचच या तरुणांची उलट तपासणी सुरु केली. त्यांच्या कडे असणारे साहित्य त्यांच्या झोळीतून बाहेर काढले. यामध्ये ग्रह, नक्षत्र आणि राशिचक्राच्या अंगठ्यांचा साठा आढळला. त्यांना त्यांची ओळख विचारली असता त्यांनी आम्ही गुजरात  येथून आलो असल्याचे नागरिकांना सांगितले.


त्यांच्याकडे ओळख पत्र आणि नावे विचारली असता त्यांनी सांगितलेली नावे आणि त्यांनी ओळखपत्र असणारे आधार कार्ड यामध्ये विसंगती आढळून आली. यामुळे नागरिकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क केला. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले आणि या तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना तेथेच काही प्रश्न विचारले असता त्या तरुणांनी आमचे सहकारी माणगाव येथे आहेत असे सांगितले. यामुळे जिल्ह्यात फकिराच्या वेशात फिरणाऱ्या तरुणांची टोळी सक्रिय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

Exit mobile version