संपकाळातील विनावापराचा परिणाम
। मुंबई । वृत्तसंस्था ।
गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेला कर्मचार्यांचा संप मिटवण्यात आणि वाहतुक सुरळीत ठेवण्यात अपयशी ठरलेल्या एसटी महामंडळाला येत्या काळात विनावापरामुळे नादुरुस्त बनलेल्या बसगाडयांचा नवा खर्च सहन करावा लागणार आहे.
एसटी गाडया जागेवर उभ्या राहिल्याने पाच महिन्यांत तीन हजारपेक्षा जास्त एसटी गाडया नादुरुस्त झाल्या असून त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळाला खर्च येणार आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2021 पासून एसटी कर्मचार्यांनी संप पुकारला. अद्यापही हा संप सुरुच असून 82 हजार कर्मचार्यांपैकी 38 हजार 600 कर्मचारी संपात सहभागी आहेत. महामंडळात एकूण 53 हजार चालक, वाहक असून त्यापैकी 33 हजार चालक, वाहक संपात आहेत. त्यामुळे सेवेत आलेले चालक, वाहक, कार्यशाळा व प्रशासकीय कर्मचार्यांना सोबत घेऊन दररोज 6 हजार बसगाडयांच्या 16 हजारपेक्षा जास्त बस फेर्या चालवल्या जात आहेत. यातून साधारण 12 लाखांपर्यंत प्रवासी प्रवास करतात.
संपकरी कर्मचार्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या असून कारवाया मागे घेण्यासही महामंडळाला सांगितले आहे. त्यानुसार महामंडळाने कारवाया मागे घेण्याचेही परिपत्रक काढले. यानंतर गेल्या काही दिवसांत एसटीत चालक, वाहकांसह अन्य कर्मचारी रुजू होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण काही दिवसांत आणखी वाढले,तर प्रवाशांना पूर्वीसारखी बस सेवा देण्यास मात्र महामंडळाला अडचण येऊ शकते. महामंडळाकडे 16 हजार बसगाडया असून यातील तीन हजार बस नादुरुस्त झाल्या आहेत. पाच महिन्यातील संपकाळात बस उभ्याच आहेत. त्याची दुरुस्ती केल्याशिवाय या बस धावूच शकत नाहीत. जसजसे मनुष्यबळ उपलब्ध होत गेले, त्यानुसार काही एसटी बस आगारातच चालवून व त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.







