| चिपळूण । वार्ताहर ।
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, अलिबाग यांचे चिपळूणमधील 146 श्री सदस्यानी रविवार (दि.22) 2.8 टन कचरा गोळा केला. चिपळूण शहरातील चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि अर्बन बँक ते भेंडी नाका असे प्रत्येकी साधारणतः चार किमीचे दोन रस्ते या प्रतिष्ठानने दत्तक स्वरूपात घेतले आहेत. चिपळूण नगर पालिकेतर्फे गुरुवार 16 जानेवारी रोजी धर्माधिकारी प्रतिष्ठानला स्वच्छता चॅम्पियन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
शहरातील 146 सदस्यांनी ओला 2.3 टन आणि सुका 0.5 टन असा कचरा गोळा करून नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकण्यात आला. कचरा वाहतूक करण्यासाठी 2 डंपरची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, वुक्ष लागवड व संवर्धन, निर्माल्य संकलन व खत निर्मिती, बंधारे निर्मिती असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असतात. त्यापैकी रस्ते दत्तक स्वरुपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबविण्यात आले आहे.या अभियानात दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.