| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्यावर पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाच पैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता, दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्थानिकांनी एका पर्यटकाला वाचवले आहे. मात्र, दोघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी (दि. 22) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुण्यातील काही पर्यटक तारकर्ली समुद्र किनार्यावर अंघोळीसाठी आले होते. त्याच दरम्यान पाच पर्यटकांपैकी तीन पर्यटक अंघोळीसाठी खोल समुद्रात गेले होते. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नये, असे सांगितले होते. तरी देखील हे पर्यटक खोल समुद्रात आंघोळीसाठी गेले. यानंतर पर्यटक पाण्यात बुडत होते. तेव्हा स्थानिक नागरिकांनी या पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तीनपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान या समुद्र किनार्यावर वारंवार अशा दुर्घटना घडत असतात. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शुभम सुशील सोनवणे, रोहित बाळासाहेब कोळी दोघेही राहणार. पुणे हे मयत झालेले असून, ओंकार रामचंद्र भोसले याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.