मुंबईतील तीन ट्रेकर्सची कर्जत ढाकभैरी येथून सुटका

| नेरळ | प्रतिनिधी |

तालुक्यातील प्रसिद्ध ढाक भैरी कड्यावर ट्रेकसाठी गेलेल्या मुंबईतील तीन तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. हेमंत कंक (24), रा. पवई, रोहित शेवाळे (25), रा. कोपरखैरणे आणि गीतेश (24) रा. ठाणे हे तिघे शनिवारी (दि.26) सकाळी आठ वाजता सांडशी ढाक भैरी ट्रेकसाठी रवाना झाले. त्यानंतर काही वेळातच ते रस्ता भटकले. कसेबसे ते भैरी गुहेजवळ पोहोचले. परंतु, तिथेही रस्ता चुकल्याने या ठिकाणी ते अडकून पडले.

अडकलेल्या या तिघांनी यूट्युबवरून शोध घेत बचाव पथकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, गीतेशच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरमार्फत रक्षा सामाजिक विकास मंडळ, कर्जत येथील रेस्क्यू टीमच्या अमित गुरव यांना सायंकाळी सात वाजता कॉल आल्यावर तातडीने या तिघांच्या सुटकेसाठी पथक रवाना झाले. आवश्यक पाणी, अन्नसामग्री आणि बचाव साहित्य घेऊन सांडशी गावात पोहोचल्यावर स्थानिक तरुणांच्या मदतीने या पथकाने शोधकार्य सुरू झाले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास या अडकलेल्या तरुणांचा शोध लागला. त्यानंतर सावधगिरीने मध्यरात्री एकनंतर या तिघांना सांडशी गावात आणण्यात आले. स्थानिक तरुणांनी या तिघांची जेवणाची व विश्रांतीची उत्तम व्यवस्था केली आणि रविवार सकाळी त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या मुंबईतील घरी पाठवण्यात आले. ही संपूर्ण घटना स्थानीय तरुणांतील सामाजिक जबाबदारी आणि रेस्क्यू टीमच्या धाडसी प्रयत्नांचे जिवंत उदाहरण ठरली आहे.

योग्य माहिती असल्याशिवाय ट्रेकिंगसाठी कोणत्याही अडचणीच्या ठिकाणी जाऊ नये. अडचणीच्या ट्रेकिंगमध्ये परिस्थिती उद्भवल्यास “महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर”(MMRCC) या रेस्क्यू टीम ला मो. 762-023-0231 संपर्क साधा.

सुमित गुरव,
रेस्क्यू टीम मेंबर, कर्जत

Exit mobile version