| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान घाटातील जुमापट्टी येथे शनिवारी (दि.23) सकाळी झालेल्या विचित्र अपघाताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश केला आहे. एस-टर्न या अवघड वळणावर एकाच वेळी तीन वाहने एकमेकांवर आदळली असून अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मान्सून सुरू झाल्यानंतर माथेरान घाटातील गटारे साफ करण्यात आली नाहीत. त्यामुळे गटारातील पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील डांबर निघून जाऊन मोठ्या प्रमाणात खड्यांच्या स्वरूपात चरी पडल्या आहेत. त्याच बरोबर खड्ड्यांतील खडी देखील रस्त्यावर पसरली आहे. परिणामी, वाहन चालक घाट उतरत असताना ब्रेक मारताना वाहनावरील नियंत्रण गमावून बसतात आणि अपघात होतात.त्यातच शनिवारी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील आलेले पर्यटक हे सकाळी घाट उतरत असताना खडीवर वाहनाचे नियंत्रण सुटल्याने समोरून घाट चढत असलेल्या कारवर धडकले. त्याचवेळी मागोमाग येणारी आणखी एक कारही नियंत्रण सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर आदळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या अपघातामुळे घाटातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
माथेरान घाटात तीन वाहनांचा अपघात
